इस्रायलने शाळेवर केलेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचे गाझामधील हमास संचलित गटाने सांगितले आहे. या शाळेत सामान्य नागरिकांनी आश्रय घेतला होता त्या ठिकाणी शेलिंग झाली आणि त्यात या नागरिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गाझामधील हमास संचालित नागरी संरक्षण गटाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (13 ऑक्टोबर) नुसेरात कॅम्पमधील या शाळेवार तोफांचा मारा झाला. यात काही कुटुंबातील सगळ्या सदस्यांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या घटनेवर इस्रायल सैन्याने या वृत्तांमधील गोष्टी तपासत आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. तर, हमासने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर यात 7 सैनिक आणि 60 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याआधीही उत्तर गाझातील एका ड्रोन हल्ल्यात रस्त्यावर खेळणाऱ्या 5 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. गाझातील नागरी संरक्षण गटाच्या प्रवक्त्याने सांगितले की, अल-मुफ्ती शाळेत गाझातील शेकडो विस्थापित लोक आश्रयासाठी थांबले होते. तेथे झालेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे, 50 लोक जखमी झाले. मागील काही दिवसांमध्ये गाझातील संघर्षाचं केंद्र उत्तर गाझा आहे. या भागात इस्रायली सैन्याने आठवडाभरापेक्षा अधिक काळ तीव्र हल्ले केले. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझातील प्रशासनाने दिली.
बीट हानौन, जबलिया आणि बीट लाहियामधील रहिवाशांनी त्यांचा जवळच्या गाझा शहरांशी संपर्क तोडण्यात आल्याची माहिती दिली आहे. गाझातील या सर्वांत मोठ्या शहराच्या सीमेवर इस्रायलचे रणगाडे दिसले आहेत. या भागातील रुग्णालयासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीचा पुरवठा खंडित झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, रेड क्रॉससह केलेल्या संयुक्त मोहिमेत 9 दिवसांच्या प्रयत्नांनंतर या रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांना पुरवठा करता आला आहे.
उत्तर गाझातील अल-शती भागात इस्रायलच्या ड्रोन हल्ल्यात रस्त्यावर खेळणाऱ्या 5 मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आहे. त्यानंतर समोर आलेल्या फोटो-व्हिडीओंमध्ये किशोरवयीन मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह दिसत आहेत. या मृत मुलांपैकी एका मुलाने त्याच्या हातात काचेच्या गोट्या पकडलेल्या दिसल्या. बीबीसीच्या प्रतिनिधीला घटनास्थळावरून मिळालेल्या वृत्तानुसार, हा ड्रोन हल्ला रस्त्यावरून चालत असलेल्या एका व्यक्तीवर झाला. त्यातच मुलांचाही मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. नंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये पाच मुलांचे मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले आणि जमिनीवर शेजारी-शेजारी ठेवलेले दिसले
इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 सैनिकांचा मृत्यू झाला. तसेच 7 सैनिक आणि 60 हून अधिक लोक जखमी झाले. हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इस्रायलने लेबनॉन आणि बैरूतवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा ड्रोन हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने उत्तर इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इस्रायलमधील 1 हजार 200 लोकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले.
1 thought on “इस्रायलच्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू, तर हमासच्या हल्ल्यात 4 इस्रायली सैनिक ठार”
Comments are closed.