भारतामध्ये मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ महात्मा गांधी यांना ओळखत नाही असा मनुष्य दुर्मिळच. गांधीजींनी शांतता व अहिंसेच्या मार्गाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. ‘ हिंसा ही तात्पुरती विजय मिळवू शकते पण कधीही दीर्घकाळ समाधान देऊ शकत नाही ‘ या मान्यतेमुळे गांधीजींचा अहिंसेवर विश्वास होता. त्यांच्या लाखो सहकारी भारतीयांच्या नजरेत, गांधी हे महात्मा (“महान आत्मा”) होते.
महात्मा गांधींचा संक्षिप्त परिचय :
पूर्ण नाव: मोहनदास करमचंद गांधी
जन्म: 2 ऑक्टोबर, 1869
जन्म ठिकाण: पोरबंदर, गुजरात
मृत्यू: 30 जानेवारी, 1948 दिल्ली, भारत
वडील: करमचंद गांधी
आई: पुतलीबाई गांधी
पत्नी: कस्तुरबा गांधी
मुले: हरिलाल गांधी, मणिलाल गांधी, रामदास गांधी आणि देवदास गांधी
व्यवसाय: वकील, राजकारणी, कार्यकर्ते, लेखक
बालपण व शिक्षण :
मोहन दास करमचंद गांधी ह्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. गांधी 9 वर्षांचे असताना त्यांनी राजकोट येथील स्थानिक शाळेत जाऊन अंकगणित, इतिहास, भूगोल आणि भाषा या मूलभूत गोष्टींचा अभ्यास केला. वयाच्या 11 व्या वर्षी ते राजकोटमधील हायस्कूलमध्ये गेले. वयाच्या 13 व्या वर्षी, महात्मा गांधींचा कस्तुरबा यांच्याशी विवाह झाला होता. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषतः अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. पोरबंदर येथे प्राथमिक शिक्षण व नंतर राजकोटमधील माध्यमिक शिक्षणानंतर ते इंग्लंडमध्ये वकीली शिकण्यास गेले. गांधींनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. त्यांच्या काही शाकाहारी मित्रांनी भगवद्गीतेची ओळख करून दिली. भगवद्गीतेने त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकला. वकीली शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला आणि कंपनी येथे काम करण्याची संधी मिळाली.
कार्य :
दक्षिण आफ्रिकेमध्ये एका रेल्वेप्रवासादरम्यान त्यांना अस्पृश्यता व रंगव्देशामुळे रेल्वेतून बाहेर काढले गेले. प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटिश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. या अपमानामुळे त्यांनी भारतीयांच्या हक्कांसाठी लढण्यास सुरवात केली. 1894 साली गांधींनी नाताळ इंडियन काँग्रेस (NIC) ची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. अल्पावधीतच गांधी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाचे नेते बनले. 1906 मध्ये गांधीजींनी भारतीयांना एकत्र करत सरकारच्या भारतीयांवरील अन्यायकारक व भेदभावात्मक कायद्यांचा विरोध दर्शविला. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला. या पहिल्या सत्याग्रहात असमानतेविरुद्ध लढा देत असताना एकत्रित जनतेला शिक्षण व सामाजिक जागरूकतेबददल समजावले. यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळून गांधीजींच्या अहिंसात्मक प्रतिरोधाच्या तत्वांचे महत्व वाढले. त्यांनी ‘सत्याग्रह’ या तत्वाचा विकास केला. सत्याग्रह म्हणजे सत्य आणि अहिंसा यांच्या आधारावर केलेला प्रतिरोध. सत्याग्रहाच्या हा अनुभव त्यांच्या आगामी जीवनासाठी एक महत्वाचा टर्निंग पाँईट ठरला होता. १९०६ मध्ये इंग्रजांनी नाताळमध्ये झुलू राज्याविरुद्ध युद्ध पुकारले. इंग्रजांच्या बाजूने लढण्यासाठी भारतीयांना भरती करवून घेण्यासाठी गांधीनी इंग्रजांना प्रोत्साहित केले. ब्रिटिशानी २० जणांच्या भारतीय स्वयंसेवकांच्या तुकडीला जाऊ दिले. जखमी सैनिकांना उपचार देण्यासाठी स्ट्रेचरवरून वाहून नेणे ही या तुकडीची जबाबदारी होती. ही तुकडी गांधींच्या नियंत्रणाखाली होती. दोन महिन्यांच्या अनुभवातून ते असे शिकले की ब्रिटिशांच्या अपरिहार्य वाढणाऱ्या मिलिटरी ताकदीस उघड उघड आवाहन देणे निराशाजनक आहे. त्यांनी ठरवून टाकले की याचा प्रतिकार हृदयातील पवित्र अश्या अहिंसात्मक पद्धतीनेच करता येईल.
गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टिकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली व सत्याग्रहाचे तंत्र विकसित करून 1915 मध्ये गांधीजी भारतात परतले. भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. ते तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. भारतातील स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या अहिंसात्मक प्रतिरोधामुळे सामान्य जनतेचा या चळवळीत सक्रिय सहभाग झाला. या अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य लढ्याला एक नैतिक आधार मिळाला. गांधीजी अहिंसेच्या मार्गाने राजकीय लढ्याव्यतिरिक्त अस्पृश्यता, स्त्री-हक्क व शिक्षण यांसारख्या विविध सामाजिक समस्यांविरोधातही लढा देत होते. गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्याग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. खेडामध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत नष्ट करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी गांधीना अटक केली. हजारो लोकांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरुंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी त्यांची मागणी मान्य केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला. त्यानुसार शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळीक मिळाली, तसेच करवाढ होऊन दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. त्यानंतर कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली.
गांधीनी १९२० साली काँग्रेसच्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. सत्याग्रहाच्या तत्वावर आधारित 1920 साली असहकार चळवळ सुरू झाली, ज्याने भारतीयांना ब्रिटिशांच्या कोणत्याही अन्यायकारक कायद्याचा शांतपणे विरोध करण्यास प्रेरित केले. या चळवळीत सर्व वर्गातील लोकांचा समवेश होता ज्यामुळे समाजात एकजुट निर्माण झाली व भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक नवा उत्साह मिळाला. पण 1922 मध्ये चळवळीला मिळालेल्या हिंसक वळणामुळे असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर १९२४ साली अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली. गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. १९२० च्या दशकाचा मोठा काळ गांधीजी प्रत्यक्ष राजकारणापासून दूर राहिले आणि त्यांनी आपले लक्ष स्वराज्य पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यावर केंद्रित केले. याकाळात गांधीजींनी ‘स्वदेशी’ चळवळीला प्रोत्साहन देत धोतर वापरण्यास सुरवात केली. इंग्रजी वस्त्रांचा बहिष्कार व स्वदेशी उत्पादनांचा वापर करून लोकांमध्ये राष्ट्रीयता जागरूक झाली, यामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदेश पसरला गेला. राजकारणाच्या पटावर ते १९२८ मध्ये परत आले. इंग्रज सरकारच्या मिठावरील करामुळे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करताना अडचणी येऊ लागल्या. याविरोधात गांधीजींनी साबरमती आश्रमातून 24 दिवसांचा पायी मार्च सुरू केला. 5 एप्रिल 1930 रोजी दांडीच्या समुद्राकाठी गोड चहा करून मिठा बहिष्कार केला. हा दांडी मार्च जगभरात प्रसिद्ध झाला ज्याने भारतीय संघर्षाचा आवाज जागतिक पातळीवर नेला.
महात्मा गांधीजींनी सामाजिक सुधारणा करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.. अस्पृश्यांना समाजात स्वीकारले जावे यासाठी त्यांनी त्यांना ईश्वराचे लोक अर्थात ‘हरिजन’ असे संबोधण्यास सुरवात केली. १९३३ साली गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली. त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही. आंबेडकरांनी दलितांना हरिजन म्हणण्याचा निषेध केला. गांधीजींनी महिलांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कुटुंबव्यवस्थेत त्यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी शिक्षण सर्वांसाठी सुलभ असावे यासाठी प्रयत्न केले. ‘स्वदेशी’ चळवळीला प्रोत्साहन देताना त्यांनी खादी कातण्यासाठी चरखा वापरण्याचे आवाहन केले. याव्दारे त्यांनी लोकांना स्थानिक उत्पादनांवर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केले, ज्यामुळे ग्रामीण समाजाला आर्थि.क आधार मिळाला. या उपक्रमांमुळे हिंदू-मुस्लिम काही प्रमाणात एकत्र येण्यास मदत झाली. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी इंग्रजांना ‘भारत सोडून जा’ असे ठणकावले. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. गांधीजींनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट १९४२ साली मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी बंदिवासात ठेवण्यात आले. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे १९४४ साली सोडण्यात आले. भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजकीय कैद्यांची सुटका करण्यात आली.
जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल अश्या प्रत्येक योजनेचा गांधीजींनी जोरदार विरोध केला. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकूल होते. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे. शेवटी उद्वेगाने गांधीजींनी आपली अनुमती दिली. भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील. शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रुपये दिले. अखेरीस भारतीय स्वतंत्र चळवळीला यश मिळाले व भारत १५ ऑगस्ट १९४७ साली स्वतंत्र झाला.
वैवाहिक जीवन :
महात्मा गांधींच्या वैयक्तिक आयुष्याने त्यांच्या कार्यावर आणि विचारधारेवर मोठा प्रभाव टाकला. पण या सर्वात त्यांना साथ लाभली ती त्यांची पत्नी कस्तुरबा यांची. एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. त्यांना हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास असे चार पुत्र झाले. १९०६ साली गांधीजींनी ब्रम्हचर्य पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहिल्या. त्या खूप धार्मिक होत्या. असे असूनही, आपल्या पतीप्रमाणेच त्यांनी जातिभेदाचा त्याग केला व सर्व जातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या आश्रमात राहिल्या. त्यांनी गांधीजींना नेहमीच साथ दिली, मग ते सत्याग्रह, आंदोलने असोत की अत्यंत साधे जीवन जगणे असो. त्यांच्या सहकार्यामुळे गांधीजीच्या कार्याला बळकटी मिळाली तर त्यांच्या प्रेमळ संबंधामुळे गांधीजींना मानसिक आधार मिळाला, ज्यामुळे ते त्यांच्या कार्यात अधिक समर्पित राहु शकले. जानेवारी 1944 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. 22 फेब्रुवारी 1944 रोजी पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये वयाच्या 74 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
महात्मा गांधीजीच्या कार्यामुळे लोक एकत्र झाले, अनेक सामाजिक सुधारणा साधल्या गेल्या, ज्यामुळे समाज अधिक समतावादी व न्यायप्रिय बनला. त्यांचा अहिंसात्मक दृष्टिकोन केवळ भारतीय जनतेसाठी मर्यादित न राहता अमेरिकेतील नागरिक हक्क चळवळ व दक्षिण आफ्रिकेतील नस्लभेदाविरुद्धच्या लक्ष्यातही जागतिक पातळीवर प्रेरणा देणारा ठरला. म्हणून गांधीजींना भारताचे ‘राष्ट्रपिता’ संबोधले जाते. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची नथुराम गोडसेने 30 जानेवारी 1948 साली हत्या केली. जी भारतीय इतिहासातील एक अत्यंत हताश व दुःखद घटना आहे. गांधीजींच्या राजघाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे. गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हणले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. आजही त्यांची जीवनशैली व विचारांची गहनता लोकांना प्रेरणा देते.
Written By Vijaysinh Desai