21वे शतक हे तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मानवाच्या स्वविकासापेक्षा जलद गतीने तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. उदाहरण मोबाईल बघा. 1973 मध्ये पहिला मोबाईल बनवला गेला, व आज लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व मोबाईल वापरत आहेत. किंबहुना मोबाईलशिवाय बाहेर वावरणे सोडा पण घरी बसणे पण अवघड आहे. मोबाईलमुळे सोई-सुविधा जलद झाल्या, तसेच्य नवीन समस्या आल्या. काहींनी प्रगती केली तर काही लोकांच्या प्रगतीमध्ये मोबाईल गतिरोधक बनला. आज आपण पाहतो की 5 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंतच्या मुलांच्या पालकांची तक्रार असते की, आमचा मुलगा, मुलगी मोबाईल, खूप वापरतात, पण ते मोबाईलचा इतका वापर का करतात ते पहिले जाणून घेऊ व त्यावर काही उपाय आखू.
ग्रामीण असो किंवा शहरी मुले मोबाईलवर जास्त वेळ घालवताना दिसतात. याचे कारण सहजसुलभ उपलब्ध झालेल्या सोयीसुविधा. पण मुले मोबाईलचा वापर करायला का सुरवात करतात हे आपण पाहू. यामध्ये दोन वेगळ्या जीवनपद्धतीचा थोडाफार प्रभाव हा दिसून येतो. ग्रामीण भाग हा मोजक्या घरांचा असतो त्यामुळे मुले शाळेव्यतिरिक्त, मित्रांच्या घरी जाणे, शेतात जाणे, मैदानावर जाणे इ. गोष्टी करतात. पण शहरात सुरक्षा कारणास्तव मुलांना स्कूलबसने घर ते शाळा ने-आण करते, तसेच मित्रांची घरे दूर असल्याने त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच नाही. आता राहिला प्रश्न घरी तर आई- वडील दोघे नोकरी करणारे, सकाळी लवकर जाऊन संध्याकाळी वेळाने येणार, त्यामुळे मुलांशी संपर्कासाठी घरी एखादा मोबाईल ठेवणे गरजेचे. अशा काही परिस्थितीकी कारणांमुळे मुळे मोबाईलचा वापर सुरु करतात. आता आपण पाहू की आपण त्यांचा मोबाईलचा वापर कमी कसा करू शकू किंवा ते शक्य नसेल तर मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना शिकवू.
मुलं मोबाईल वापरतात कारण त्यांना ते मजेशीर वाटत. समजा जर ते गेम खेळत असतील, तर ते कोणत्या प्रकारचे गेम खेळतात हे बघा. जर ते PUBG सारखे गेम खेळत असतील तर त्यांना तुम्ही तुमच्या बालपणी खेळलेले खेळ गमतीशीर पद्धतीने सांगा जेणेकरून मुले त्यांच्या मित्रांसोबत प्रत्यक्षात खेळण्यास प्रयत्न करतील. तसे केल्यावर त्यांनी कोणता खेळ कसा खेळला हे पण विचारा. हे जर शक्य झाले नाही तर त्यांना घरगुती चेस, कॅरम व्यापार सारखे ब्रेनगेम शिकवा. मुलांकडे अभ्यासाव्यतिरिक्त खूप सारा वेळ राहत असेल तर तुम्ही त्यांना गिटार, सुरपेटी क्लासेस लावा, किंवा नृत्य, चेस, विदेशी भाषा यांसारखे त्यांना भविष्यात उपयोगी पडू शकणारे कोर्स लावू शकता. व ते जे शिकतात ते तुम्ही त्यांच्याकडून शिकताय असे दाखवून एक चांगला संवाद निर्माण करू शकता. खूप सारे पालक वायफाय बंद करणे, हातातून मोबाईल खेचणे, अशा गोष्टी करतात पण मानसशास्त्रीयरित्या मुले त्याच गोष्टीकडे जास्त आकर्षित होतात ज्याला तुम्ही विरोध करता. जर ते रील्स पाहत वेळ घालवत असतील तर त्यांना अनिमेशन कथा दाखवा. मोबाईलचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याचे मार्ग सांगा. मोबाईल वर पुस्तके वाचने, त्यांचे प्रश्न Google ला विचारणे, Youtube वरून एखादी स्किल शिकणे. या सर्व गोष्टी करण्यासाठी तुम्ही त्यांना एक ठरावीक वेळ द्या. जेणेकरून मुले मोबाईल वापरला म्हणून खूष व तुम्हीही खूष. काठी APPS आहेत जे मोबाईल मध्ये child Mode द्वारे मुलांना काही लिमिटमध्ये मोबाइलचा वापर करू देतात. तसेच ते काय करतात हे पालकांनाही समजू शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा फायदा नक्की करून घ्यावा.
मुलांचे मोबाईल व्यसन सोडविणे हे एक कल्पनात्मक व पदधतशीर कार्य आहे. जे पालक व मुले यांचे मानसिक व शारिरिक संतुलन बिघडवू न देता वरील उपायांद्वारे पूर्ण करता येईल. मुलांना मोबाईलचा वापर करण्यास प्रतिबंध करणे चुकीचे आहे याउलट त्यांना मोबाईलचा स्वतःच्या प्रगतीसाठी कसा वापर करता येवू शकतो हे शिकवले पाहिजे.