IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक

Photo of author

By Vijaysinh Desai

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने या कसोटी विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे.

IND vs AUS


IND vs AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India : 

सिडनी कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या कसोटी विजयासह पाच सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली. यासह ऑस्ट्रेलियाने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्याचबरोबर तब्बल दहा वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरले. या सामन्यात भारतीय संघाने १६२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. ज्यामुळे टीम इंडियाला चार धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव १५७ धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेड (३४) आणि वेबस्टर (३९) यांच्या नाबाद खेळीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताच्या या पराभवाने कोट्यवधी भारतीय चाहत्यांची निराशा केली या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२५ च्या शर्यतीतूनही बाहेर झाली.

टीम इंडियाची झाली निराशा –

याआधी दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीस फायनलसाठी पात्र ठरली होती आणि आता फायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल २०२३-२५ मध्ये ऑस्ट्रेलियाला अजून २ कसोटी खेळायच्या आहेत. टीम इंडियाने या सायकलची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. केवळ विजयच टीम इंडियाला पुढे नेऊ शकत होता.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने सॅम कॉन्स्टास (२२), उस्मान ख्वाजा (४१), मार्नस लॅबुशेन (६) आणि स्टीव्ह स्मिथ (४) यांचे विकेट गमावले होते. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि ब्यू वेबस्टर यांनी ४६ धावांची नाबाद भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारत दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय उतरला होता. बुमराहला पाठीच्या दुखारतीमुळे बाहेर झाला होता. त्याच्या जागी विराट कोहली कर्णधार नेतृत्त्व करत होता. भारताकडून प्रसिध कृष्णाने तीन तर सिराजला एक विकेट मिळाली.

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी 4 सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात यायची. ऑस्ट्रेलियाने अखेरीस 2014-15 साली मायदेशात टीम इंडियावर 2-1 अशा फरकाने मात करत मालिका जिंकली होती. त्यानंतर टीम इंडियाने सलग 3 वेळा या 2-1 अशा फरकाने ही मालिका जिंकली. मात्र यंदापासून या मालिकेत 4 ऐवजी 5 सामने खेळवण्याची पहिलीच वेळ ठरली. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर कौटुंबिक कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थितीत असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला. रोहितच्या नेतृत्वात भारताला 2 सामने गमवावे लागले तर 1 सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे चौथ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

रोहितने कॅप्टन्सी आणि बॅटने फ्लॉप ठरल्याने पाचव्या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बुमराहला नेतृत्वाची संधी होती. मात्र बुमराह आणि ऋषभ पंतचा अपवाद वगळता इतर कुणालाही जबाबदारी पार पाडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामन्यासह मालिका गमवावी लागली.

IND VS AUS :

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Read More