Maharashtra Elections 2024: महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक

आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही विद्यमान महायुती सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक असण्याची दाट शक्यता आहे.  बैठकीनंतर 24 तासात कधीही आचारसंहिता लागू शकते. मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. त्यानंतर आज सकाळी पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे.

राज्याची विधानसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्यााची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला जात आहे. तर, दुसरीकडे मंत्रालयात प्रशासकीय पातळीवरही निर्णयांच्या अंमलबजावणीसाठीच्या कार्यवाहीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले होते. राज्य मंत्रिमंडळाची बैठक 10 ऑक्टोबर रोजी पार पडली होती. या बैठकीत कॅबिनेटने तब्बल 80 निर्णय घेतले होते. ही कॅबिनेट बैठक शेवटची असेल असे म्हटले जात होते. पण, आज पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर कोणत्याही क्षणी 24 तासांमध्ये आचारसंहिता लागणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया निकालासह 26 नोव्हेंबर पूर्वी पूर्ण केली जाईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधीच स्पष्ट केले आहे. आचारसंहितेचा कालावधी 30 दिवसांचा असेल हे लक्षात घेता आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू केली जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया निकालांसह पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता याच आठवड्यात लागू होणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.