टाटा समुहाचे सर्वेसर्वा आणि पद्म विभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा (Ratan Tata) यांनी बुधवारी रात्री ब्रीचकॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा जी दीर्घकाळ आजारी होते. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रतन टाटा जी यांनी 30 वर्षे टाटा समूहाचे नेतृत्व केले. ते टाटा सन्सचे अध्यक्षही होते. रतन हे टाटा ट्रस्टचेही प्रमुख होते.
टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला रतन नवल टाटा यांना निरोप देताना अत्यंत दु:ख होत आहे. ते एक महान नेते होते. त्यांनी केवळ टाटा समूहालाच नव्हे तर आपल्या देशालाही आकार दिला. टाटा समूहासाठी, श्री टाटा हे केवळ चेअरपर्सनपेक्षा अधिक होते. माझ्यासाठी ते गुरू, मार्गदर्शक आणि मित्र होते. रतन टाटा जी आता आमच्यात नाहीत. पण त्याचे विचार आणि मूल्ये कायम राहतील.
7 ऑक्टोबर 2024 रोजी अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांनी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. वृत्तानुसार, सुरुवातीला त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले, परंतु नंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला.
रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण जग दुःख व्यक्त करत आहे. प्रसिद्ध उद्योजक असलेले रतन टाटा कायमच आपल्या कृतीतून प्रत्येकाला आपल्या जवळचे वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींनी रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांना भावनिक श्रद्धांजली वाहिली.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर लिहिले की, ‘रतन टाटा यांनी आपल्या जीवनाने आणि निधनाने देशाला हादरवून सोडले आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळाला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, पण जे लाखो लोक त्यांना भेटू शकले नाहीत त्यांना जे दु:ख वाटतंय तेच दुःख आज मलाही वाटते. त्याचा परिणाम असाच आहे’. ‘प्राण्यांवरील प्रेमापासून ते त्यांच्या परोपकारापर्यंत, त्यांनी दाखवून दिले की खरी प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण अशा लोकंची काळजी घेतो ज्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्याचे साधन नाही’. तेंडुलकरने पुढे भावनिक होतं म्हंटले की, ‘श्री रतन टाटा तुमच्या आत्म्याला शांती लाभो. तुमचा वारसा तुम्ही उभारलेल्या संस्था आणि तुम्ही स्वीकारलेल्या मूल्यांद्वारे जिवंत राहील’.
सिमी गरेवाल यांनी त्यांच्या X ट्विटर हँडलवर रतन टाटा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत सिमी ग्रेवालने लिहिले की, ‘ते म्हणतात की तू गेलास. तुझे जाणे स्वीकारणे खूप कठीण आहे. अलविदा माझ्या मित्रा… #RatanTata असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सिमी ग्रेवाल यांनी रतन टाटा यांच्यासाठी लिहिलेली ही खास पोस्ट अतिशय महत्त्वाची आहे. जवळच्या व्यक्तीचं जाणं आणि त्यावेळी व्यक्त केलेल्या भावना या मनाला चटका लावून जातात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी अत्यंत भावूक शब्दांमध्ये त्यांना आदरांजली वाहिली आहे. “रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं,” असं राज यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टच्या सुरुवातीला म्हटलं आहे.